
हिन्द टीवी – मराठी,
नांदेड जिल्ह्यातील मार्केट कमिटी मैदान येथे शिवसेनेच्या वतीने आभार सभा आयोजित करण्यात आली होती. नांदेडवासियांनी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील मतदारांचे मनापासून आभार मानले. महायुती सरकारने सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ योजना’ बंद होणार नाही, असे यावेळी निक्षून सांगितले.
नांदेड ही सचखंड म्हणजे सत्याची भूमी असून येथे सत्याचाच विजय झाला. नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ९ जागा महायुतीच्या जिंकून आल्या. हे यश लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांचे आहे. याच मैदानावर लाडक्या बहिणींचा मेळावा घेतला होता व हजारो लाडक्या बहिणी त्यावेळी आशिर्वाद द्यायला आल्या होत्या. तुमच्या १५०० रुपयांच्या ओवाळणीमध्ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना तुम्ही नुसता जोडा दाखवला नाही तर जोरात हाणलात. माझ्या बहिणींनी एकच मारला पण सॉलिड मारला आणि सावत्र भावाना चारीमुंड्या चित करून टाकले. नांदेडकर जनतेने महायुतीला पैकीच्या पैकी मार्क दिले त्याबद्दल तमाम मतदारांचे जाहीर आभार मानले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आणि खरी शिवसेना कोण हे मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले. शिवसेना वाढत असून राज्यभरातून उबाठा आणि इतर पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज उबाठा गटाचे परभणी जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनीही शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचेही यावेळी मनापासून स्वागत केले.
महायुती सरकार आल्यानंतर मराठवाडा वॉटरग्रीड, जलयुक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरु केल्या. मराठावाड्याची दुष्काळवाडा ही ओळख पुसायची आहे. जलयुक्त शिवार योजना सुरु केली. अडीच वर्षात शेतकऱ्यांच्या योजनांसाठी ४५००० कोटी रुपये दिले. शेतकरी सन्मान योजनेत वर्षाला १२००० रुपये दिले. एक रुपयात पीक विमा दिला, वीज बील माफ केले. अशा अनेक योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचे याप्रसंगी नमूद केले.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार निवडून आले. आता हे चार आमदार नांदेडच्या विकासाचा चौकार मारतील आणि या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलतील, असेही यावेळी जाहीरपणे सांगितले.
जिल्ह्यातील हळद संशोधन केंद्राचे काम लवकरच सुरु होणार आहे. एमआयडीसीचा प्रश्न आपण सोडवणार असून पाण्याचे, रस्त्याचे विषयही मार्गी लावू असेही याप्रसंगी अधोरेखित केले. ‘गाव तिथे शिवसेना’ हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी सदस्य नोंदणी वाढवायची आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या शिलेदारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागावे असे आवाहन यासमयी केले.
यावेळी आमदार एकनाथ शिंदे, हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद बोंडारकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर तसेच शिवसेनेचे नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
