
हिन्द टीवी – मराठी, रत्नागिरी
संपूर्ण कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळवून दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत येथील स्थानिक जनतेचे जाहीर आभार मानले.
यावेळी बोलताना, पक्षात कोणी चांगले काम केले की त्याचे खच्चीकरण करण्याचे काम काहीजणांनी पूर्वी केले. तो अनुभव रामदास कदम, नारायण राणे आणि मी देखील घेतला. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवून अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली. मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना गहाण टाकण्याचे पाप तुम्ही केले होते तो धनुष्यबाण सोडवण्याचे काम एकनाथ शिंदे याने केले असे निक्षून सांगितले. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण टाकलेल्यांकडे परिवारवाद आहे तर आमचा महाराष्ट्रवाद आहे. त्यांचा फेक नरेटिव्ह तर आमचे काम पॉझिटीव्ह असे सांगत उबाठा गटावर टीका केली.
कोकणातील सागरी महामार्गाचे काम सुरु आहे. मुंबई गोवा महामार्ग लवकरच पूर्ण करु याशिवाय मुंबई-सिंधुदुर्ग अँक्सेस कंट्रोल एक्सप्रेस हायवे देखील केला जाणार आहे. रत्नागिरी एमआयडीसीमध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक झाली असून यातून ३८ हजार रोजगार उपलब्ध होतील. आंबा, मासे आणि पर्यटनाला चालना देण्यात आली असून कोकणात कोयनेत वाहून जाणारे ६७ टीएमसी पाणी थांबवण्यासाठी काम सुरु झाले आहे. त्यामुळे कोकणाचा कॅलिफोर्निया करायचे असे म्हणण्याऐवजी आता कॅलिफोर्नियाला कोकण व्हावेसे वाटले पाहिजे असा कोकण विकसित करायचा असल्याचे नमूद केले.

याच सभेत उबाठा गटाचे माजी आमदार सुभाष बने, उबाठा जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळशेठ जाधव, प्रशांत सुर्वे, तालुकाप्रमुख संदीप सावंत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन साळवी तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
